|| श्री ||
पीतांबरधरम् देवम् गौरीपुत्रम् चतुर्भुजम् |
सर्वकार्येषु सिद्ध्यर्थम् तं नमामि गजाननम् ||
अपरांत भूमीवासी ग्रामे कोळथरे स्थितः|
कुळदेव कुळत्राता श्री कोळेश्वराय नमो नमः||
आदिशक्ती जगत अंबा जोगाई कुलदेवता |
विश्वकल्याण सिद्ध्यर्थम् योगेश्व-यै नमो नमः||
‘कुल’ हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ वंश-घराणे असा आहे तर प्राकृतात 'कुल' म्हणजे एकत्र येणे, गोळा होणे. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये संघटित समाज ही काळाची गरज बनली आहे. सर्वसमावेशकता ही जरी त्यामध्ये अपेक्षित असली तरीही त्या स्तरापर्यंत पोहोचण्यापूर्वी निदान आपल्या कुलामधील बांधवांची मोट बांधणे व प्राथमिक स्तरावर एक संघटना बनवणे या उद्देशाने अनेक आडनावांची कुल संमेलने भरताना आज आपल्याला दिसते.
२३ डिसेंबर २००७ रोजी संपन्न झालेल्या जागतिक चित्पावन संमेलनानंतर मोडक कुटुंबीयांनी कायमच एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे ठरवले व त्याच वेळी अप्रत्यक्षपणे चित्पावन मोडक कुलन्यासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर सदर न्यासाची अधिकृत स्थापना झाली.
या कुलन्यासाची कार्यपद्धती सर्वांसमोर यावी, सर्व कुलबंधूंशी अप्रत्यक्षपणे संवाद साधला जावा आणि कुलवृत्त्तान्ताचे निमित्ताने संकलित झालेली माहिती सर्वांना उपलब्ध व्हावी म्हणून हा ‘संकेतस्थळ’ रूपी लेखनप्रपंच.
