कुलदैवत
- प्रस्तावना
- मोडकांचे मूलस्थान
- श्री कोळेश्वर
- श्री योगेश्वरी
- श्री महालक्ष्मी
- श्री रामेश्वर
- श्री भरतेश्वर
- कुलधर्म-कुलाचार
- देवस्थानांचे दिशानिर्देश
एखाद्या कुटुंबातील कुलदैवत व कुलदेवता या देखील दोन महत्वाच्या संकल्पना. आजच्या एकविसाव्या शतकात झालेल्या वैज्ञानिक क्रांतीनंतरही परमेश्वरावरील श्रद्धा कमी झालेली नाही. त्या निर्गुण निराकार शक्तीचे अस्तित्व भल्याभल्यांनाही मंत्रमुग्ध करणारे आहे.
देव हा जरी एकच असला तरीही स्थानमहात्म्य म्हणून जे काही अस्तित्वात आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाचा एक कुलस्वामी व एक कुलस्वामिनी असते. एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष व कर्ती स्त्री ज्या प्रमाणे घरातील व्यक्तींचे पालन पोषण व रक्षण करतात त्या प्रमाणे कुलदैवत व कुलदेवता विशिष्ट घराण्याचे पालकत्व पत्करून त्यांचे पालन पोषण करतात व समृद्धी आणि सौख्य देतात. तसेच कुलवृत्तांत लिहितांना देखील विशिष्ट देवस्थानांच्या नोंदी विचारात घेतल्या जातात व त्यायोगे अप्रत्यक्षपणे एका कुलास एकत्र बांधून ठेवण्याचे काम ही कुलदैवते करतात. हे पृष्ठ आपल्याला मोडक घराण्यांची मूलस्थाने, कुलदैवते आणि कुलधर्म-कुलाचार याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी मदत करेल.
बहुतांश मोडक घराणी ही कोळथरे येथील श्री कोळेश्वरास आपले कुलदैवत तर अंबाजोगाई योगेश्वरीस कुलदेवता मानतात. उदरनिर्वाहासाठी झालेली स्थलांतरे व तदनुषंगाने आलेली स्थित्यंतरे यामुळे कुलस्वामी व कुलस्वामिनी देखील बदलत गेले असून कुलग्रंथातील उल्लेखानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर त्रिंबक येथे स्थलांतरित झालेली घराणी श्री रामेश्वरास तर मसुरे येथील घराणी श्री भरतेश्वरास कुलस्वामी मानतात. अजून खोलात जावून पाहिल्यास कुलग्रंथात असे नमूद केले आहे की सर्व चित्पावन मोडक हे रत्नागिरी मधील कर्ले भाट्ये येथून कोळथऱ्यास स्थलांतरित झाले व त्यांचा आधीचा कुलस्वामी हा काळभैरव होय.
कुलग्रंथात एके ठिकाणी असे म्हटले आहे की सर्व चित्पावन मोडक यांचे पूर्वीचे उपनाव ओक होते. त्यानुसार गुहागरच्या श्री देव व्याडेश्वरास काही मोडक लोक आपला कुलस्वामी मानतात. तसा उल्लेख एका अधिकृत पुस्तकात आहे. तसेच काही घराणी गुहागरच्या श्री नवदुर्गा देवीस कुलदेवता मानतात तर काही घराणी करवीरवासिनी महालक्ष्मीदेवीस त्यांची कुलस्वामिनी मानतात. उपरोल्लेखित स्थलांतराचाच हा सर्व परिणाम असावा असे वाटते. असो….
कालाय तस्मै नमः |

मोडकांचे कोकणातील मूलस्थान कोणते यासंबंधी विचार करावयाचा झाल्यास स्थूल मानाने २९ मोडक घराण्यांचे चार गट पडतात.
१) घराणे क्र. १ ते २४ व २९ यातील व्यक्ती नाशिक आणि त्र्यंबकच्या लेखात आपले मूळ गाव पंचनदी देतात.
२) घराणे क्र. २५ हे आपले मूळ गाव मालवण तालुक्यातील त्रिंबक सांगतात.
३) घराणे क्र. २६ हे आपले गाव मालवण तालुक्यातील मसुरे सांगतात.
४) घराणे क्र. २७ व २८ यांना आपले मूळ गाव माहित नाही.
तथापि घराणे क्र.२८ यातील लोक आपला कुलस्वामी काळभैरव सांगतात.काळभैरव हे कोळेश्वराचे रूप मानिल्यास घराणे क्र.२८ हे ही पहिल्या गटात बसू शकेल. आख्यायिका अशी आहे की पंचनदीच्या मोडकांचा मूळ पुरुष हा कर्लेभाटे-भैरव-स्थापन येथून प्रथम कोळथरे इथे आला आणि स्थायिक झाला. पुढे तो किंवा त्याच्या वंशापैकी कोणीएक कोळथरे इथून पंचनदी येथे वस्तीस आला. यावरून याही गटाचा कोळेश्वर हा मुल स्थानचाच देव आहे. वास्तविक पाहाता या गटांतील मंडळींनी कर्लेभाटे - भैरव - स्थापन येथील देव आपला कुलस्वामी सांगावयास पाहिजे होता. परंतु बहुत काल लोटल्यामुळे मुळच्या कुलस्वामीच्या जागी नवीन वसाहतीच्या स्थानिक देवतेसच कुलस्वामी मानु लागले. कदाचित सर्व मोडक मुळचे कर्लेभाटे येथीलच असतील. जसा घराणे क्रमांक १ ते २४ यांचा मुळ पुरूष उत्तरे कडे वळला. तसे घराणे क्रमांक २५, २६, २७ नि २८ यांचे मुळ पुरूष त्या वेळी किंवा त्यांच्या आगे मागे दक्षिणे कडे वळले असावेत. आणि ज्या प्रमाणे पहिल्या गटांतील मंडळी कर्लेभाटे येथील कुलस्वामीस विसरून राहत्या गावातील देवास कुलस्वामी मानु लागले तद्वत गट २ नि गट ३ आणि घराणे क्रमांक २७ - २८ यांतील मंडळी मानु लागली असावीत.

II श्री कोळेश्वर प्रसन्न II
नारळी पोफळीच्या वाड्या आणि अवर्णनीय निसर्ग सौंदर्याने नटलेले कोळथरे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात समुद्रकिनारी आहे. दापोलीपासून कोळथरे सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे.
कोळथरे येथील श्री कोळेश्वर कुलदैवत म्हणजे ब्रह्मा विष्णु महेशांचे त्रिगुणात्मक स्वयंभु स्थान आहे. या देवस्थाना संबंधी दंतकथा प्रचलित आहे ती अशी.सध्या ज्या ठिकाणी देवस्थान आहे तेथे पूर्वी भात जमीन होती. एकदा कोळथरे येथील एक कोळी शेतीसाठी जमीन नांगरीत असता नांगराच्या फाळास रक्त लागलेले त्याला आढळले. नि एका जागी लाल रंगाचे उदक त्याच्या दृष्टीस पडले. हा प्रकार पाहून कोळी भयभीत झाला आणि नांगर सोडून घरी गेला. वाटेत त्याने ही शेतातील हकीकत सर्वाना सांगितली. त्या बरोबर हा चमत्कार पाहण्यासाठी गावातील आबालवृध्द मंडळी शेताकडे धावू लागली. सर्वाना हा चमत्कार पाहुन आश्चर्य वाटले. परंतु याचे कारण कोणासहि उमजेना. शेवटी निराश होउन सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. रात्री कोळयास स्वप्नात श्रींनी त्रिगुणात्मक दर्शन देउन आपण प्रकट झाल्याचे सांगितले. सकाळी कोळयाने आपणास झालेला दृष्टांत गावातील मंडळींना सांगितल्यावर गावातील लोक शेतातील त्या स्थळा जवळ गेले आणि भोवतालची जागा स्वच्छ केली. तो तेथे स्वयंभु लिंग सर्वाच्या दृष्टीस पडले. सर्वानी देवास नमस्कार केला थोडयाच काळात तेथे लहानसे देउळ बांधिले. या देवस्थानाचा कोळयास दृष्टांत झाला म्हणून कोळेश्वर असे देवास नाव दिले वर सांगितल्या प्रमाणे हे शिवदैवत नसुन त्रिगुणात्मक म्हणजे ब्रह्मा – विष्णु – महेश असे तीन देवतात्मक स्थान आहे. पुजारी गुरव नसुन ब्राह्मण आहे. या देवास दाखविलेला नैवेद्य शिवस्व नसल्यामुळे घरी घेण्याची येथे चाल आहे. त्रिगुणात्मक कोळेश्वर असे देवाचे नाव आहे. ज्या कोळयास या स्थाना बद्दल दृष्टांत झाला त्या कोळयाचे वंशज जवळच असलेल्या बुरोंडी गावी राहातात. येथे फाल्गुनात होत असलेल्या उत्सवांत या कोळी घराण्यांतील पुरुष बलि आणितो नि गावक-यां कडुन त्यास मान मिळतो.
हे देवस्थान प्रकट झालयाचा काल निश्चित समजत नाही तथापि ५०० वर्षे तरी झाली असतील. येथील एका जोशी उपनावाच्या गृहस्था जवळ शक १४३० मध्ये लिहिलेला एक ग्रंथ होता. त्या ग्रंथाच्या प्रत्येक पृष्ठावर ‘कोळेश्वर’ अशी अक्षरे लिहिलेली होती. हा ग्रंथ लिहिला तत्पुर्वी अनेक वर्षे तरी हे देवस्थान प्रकट असावे असे अनुमान निघते. श्री कोळेश्वराचे देवालय संपूर्ण पंचायतन आहे. दत्तस्वरूप असल्यामुळे श्री कोळेश्वरासमोर इतर शिव मंदिरासमोर असतो तसा नंदी आपल्याला दिसत नाही. शिवपिंडीस घालतो तशा तीन चतुर्थांश प्रदक्षिणा न घालता संपूर्ण प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात आहे..
देवालय गावच्या वस्ती पासून थोडेसे दूर असुन पुर्वाभिमुख आहे. देवळाच्या दक्षिणेस पुष्करणी नावाचे तीर्थ आहे. देवळाच्या पश्चिमेस भातशेती असुन उत्तरेस एक लहानशी नदी आहे. नदीचे काठावर श्री मारूतीचे देउळ आणि लाटे यांनी बांधिलेली धर्मशाळा आहे. मारूतीचे देउळ कोळथरे येथील सोमण यांनी बांधिले आहे. देवळाचे भोवती ८ फुट उंचीची पोवळी आहे. या पोवळीत दक्षिणेस नि उत्तरेस असे दोन दरवाजे आहेत. देवालयाच्या पुर्वेस पोवळी वर नगारखाना आहे. हा ग्रामस्थांनी द्रव्य जमवून बांधिला आहे. याची सर्व व्यवस्था येथील विश्वस्तांच्याकडे आहे. देवालयाच्या आवारांत ग्रामदेवता, जाखाय, काळकाय, श्रीविष्णु, श्री गणपति यांची लहान देवळे आहेत. विष्णु, गणपति यांची देवळे नि श्री कोळेश्वराच्या देवळाचा सभा मंडप टेंभु येथील लाटे यांनी बांधिला असे म्हणतात. ग्रामदेवतेच्या देवळाचा जिर्णोध्दार येथील ब्राह्मणेतर मंडळींनी केला. येथील स्वयंभु लिंगाच्या छिद्रांतुन नित्य गंगा निघत असते आणि अभिषेकाच्या वेळी सिंहनाद होत असतो असे सांगतात.
कोळेश्वर देवाचा उत्सव प्रति वर्षी कार्तिक शुद्ध १० पासुन वद्य १ पर्यत होत असतो. नित्य श्रीस रुद्राभिषेक महापूजा नि नैवेद्य, रात्री आरती नंतर पालखीतून श्रीं ची मिरवणूक, भजन इत्यादि कार्यक्रम असतो. प्रतिपदेस ललितोत्सव नि समाराधना होते. या महोतसवा व्यतिरिक्त वर्ष प्रतिपदा नि विजयादशमी या दिवशी श्रीं ची पालखी निघते.
II श्री योगेश्वरी प्रसन्न II
योगेश्वरी देवी ही बहुसंख्य चित्पावन कुटुंबियांची कुलस्वामिनी आहे. देवी योगेश्वरी ‘कुमारी’ मानली जाते. ही देवी कुमारी कशी राहिली राहिली या विषयी एक पुराण कथा आहे. पार्वती रूपातील योगेश्वरीचा विवाह परळी वैजनाथ येथील शिवशंकराशी करण्यात येणार होता.वऱ्हाडी मंडळी परळी वैजनाथ पासून काही अंतरावरील जवळील एका आमराईत येऊन थांबली. परुंतु विवाह मुहूर्ताची वेळ उलटून गेली. तोपर्यंत शिव परळी वैजनाथहून निघून गेले होते.तिथे त्यांची केवळ स्वयंभू पिंड राहिली. विवाह न झाल्यामुळे ती कुमारिका राहिली.आणि तांदळा स्वरुपात प्रकट झाली. ही कुलदेवता कशी झाली याविषयी आणखी एक पौराणिक कथा आहे. कोकणच्या समुद्र किनारी अर्धमृत अवस्थेत असलेल्या १४ व्यक्तींना संजीवनी देऊन जिवंत केल्यानंतर त्यांच्या बरोबर विवाह लावून देण्यासाठी परशुरामांनी अंबाजोगाई येथूनच वधू कोकणात नेल्या.आपल्या मुलींची पाठवणी करताना अंबाजोगाईच्या लोकांनी अशी एक अट घातली की,कोकणात ज्या कुलात अंबाजोगाईहून नेलेल्या वधूंचा विवाह होईल त्या प्रत्येक कुलांनी योगेश्वरी देवीला कुलदैवत मानावे म्हणून ती झाली चित्पावनांची कुलस्वामिनी.
अंबेजोगाईचे मंदिर व कळस हेमाडपंती बांधणीचे आहे.त्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. उत्तरेच्या द्वारासमोर सुंदर दीपमाळ आहे. महाद्वारासमोर कुंड असून त्याला सर्वतीर्थ म्हणतात. या आवारात वेगवेगळ्या देव-देवतांची छोटी छोटी देवळे आहेत. देवीची मुख्य मूर्ती तांदळा आहे. आश्विन व मार्गशीर्ष मासात तिचे दोन मोठे उत्सव होत असतात. रोज येणार्यांना देवळात प्रसाद म्हणून तांबूल दिले जाते. मंदिराभोवतीची तटबंदी यादवराजांचा सेनापती खोलेश्वराने बांधलेली आहे. मंदिरापासून थोड्या अंतरावर जयंती नदी आहे.
अंबाजोगाई (योगेश्वरी मंदिर) हे मराठवाड्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ रेल्वे स्थानकापासून ३५ कि.मी., बीडपासून ९५ कि.मी. औरंगाबादपासून २३३ कि.मी. आणि मुंबईपासून ४९५ कि.मी.आहे.देवगिरीच्या यादवांच्या कालखंडात हे अतिशय समृद्ध नगर होते.निजामाच्या कारकीर्दीत इ.स.१९०२ साली याचे नाव बदलण्याचा प्रयत्न झाला.परंतु महाराष्ट्र राज्यात पुनश्च ते अंबाजोगाई म्हणून प्रसिद्ध झाले.
II श्री महालक्ष्मी प्रसन्न II
अखिल महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या व देवीच्या साडेतीन पीठांमधील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून समजल्या जाणार्या करवीरवासिनी आई अंबाबाईस काही चित्पावन मोडक घराणी आपली कुलस्वामिनी मानतात. श्री महालक्ष्मीस व्यंकटेश्वर बालाजीची अर्धांगिनी समजले जाते व ती पतीवर रुसून कोल्हापुरास येउन स्थायिक झाली अशी एक दंतकथा आहे. हेमाडपंथी बांधणीचे हे मंदिर प्रत्यक्ष विश्वकर्म्याने बांधले आहे असेही काही लोक म्हणतात तर काहींच्या मते पांडवांनी हे मंदिर बांधले असावे. मतितार्थ हा की या मंदिराचे बांधकाम अतिशय प्राचीन असून त्याची रचना खूप प्रेक्षणीय आहे. अंबाबाईची धीरगंभीर परंतू तरीही लोभस मुद्रा पहातच बसावे व गाभार्यासमोरून हलूच नये असे वाटल्याशिवाय रहात नाही.
II श्री रामेश्वर प्रसन्न II
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळील आचरा येथे इ.स. १६८४ च्या सुमारास बांधण्यात आलेले 'इनामदार श्रीदेवरामेश्वर मंदिर' म्हणजे वास्तुकलेचा एक अजोड नमुना होय. लाकडी कलाकुसरीने सुशोभित केलेला सभामंडप आणि भिंतींवर कोरलेल्या सुबक मूर्ती मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. आपल्या चित्पावन मोडक उपनामाच्या काही घराण्यांचे मूळगाव आच-याजवळील चिंदरत्रिंबक असून ते श्री रामेश्वरास कुलस्वामी मानतात. कोल्हापूरचे छत्रपती श्रीशंभूराजे यांनी या गावची जहागिरी प्रत्यक्ष श्रीरामेश्वराच्या नावे बहाल केली असून त्यामुळे देवासच इनामदार असे संबोधले जाते. रामनवमी, हनुमानजयंती, दसरा, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्री हे मंदिराचे प्रमुख उत्सव आहेत.
II श्री भरतेश्वर प्रसन्न II
मालवणपासून जवळच असलेल्या कसबा मसुरे गावाचे ग्रामदैवत 'श्री देव जैनभरतेश्वर' यास काही चित्पावन मोडक घराणी आपले कुलदैवत मानतात. हे मंदिर मसुरे गावातील देऊळवाडा भागात असून त्याचे बांधकाम अतिशय प्राचीन म्हणजे सुमारे बाराव्या शतकातले आहे. आजूबाजूला इतरही खूप देवळे असल्यामुळे या भागास देऊळवाडा असे संबोधले जाते. गाभा्र्यात शिवपिंडीच्या उजव्या बाजूस जैनाचे पाषाण आहे. गाभा्र्याच्या बाहेर उजव्या बाजूला श्री गणपती व श्री सूर्य तर डाव्या बाजूस श्री विष्णू व श्री महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. दरवाज्यावर कीर्तीमुख असून मंदिराचे बाहेर गाभा्र्याच्या डावीकडे श्री सोमनाथाची पिंडी आहे. श्री भरतेश्वरासमोरील नंदीचे शिल्पदेखील फारच रेखीव आहे.
कुलधर्म-कुलाचार
कोकणची वा कोकणातून नुकतीच घाटावर (देशावर) आलेली मोडक मंडळी वर्षातून दोन वेळा म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध १,(देवदिवाळी) आणि फाल्गुन वद्य १ (धुळवड) अशा दोन वेळी वार्षिक नैवेद्य दाखवतात. देशावर बरेच दिवस स्थाईक झालेली मंडळी प्रतिवर्षी एकदाच म्हणजे देवदिवाळीस नैवेद्य दाखवतात. नैवेद्यास कोकणचे पक्वान्न म्हणजे वडे-घारगे असायचे. देशावर आल्यावरसुद्धा या नैवेद्याकरिता वडे-घारगेच करतात. देशावर येऊन ज्यांना बरेच दिवस झाले आहेत असे लोक त्या दिवशी पुरण घालतात आणि तळण ठेवतात. नैवेद्याच्या देवता कुलस्वामिनिशिवाय काही स्थलदेवता आणि ग्रामदेवता असतात. कोकणातून देशावर आल्यावरसुद्धा कोकणातील देवतांची आठवण ठेऊन त्यांना नैवेद्य दाखवणे हे चित्पावनांचे एक वैशिष्ट्य आहे. नैवेद्यांच्या देवतांवरून स्थूलमानाने त्या कुटुंबाचे मूलस्थान कोणते आणि त्याचे परिभ्रमण कसे कसे झाले हे सांगता येते.बोडण हे चित्पावनांचे दुसरे वैशिष्ट्य आहे. त्याचा संबंध वर्धनाकडे असल्यामुळे जननानंतर नि विवाहानंतर बोडण भरण्याची चाल पुष्कळ चित्पावन कुलाप्रमाणे मोडक कुलातील सर्वांकडे आहे (मसुरे, नागपूर नि सोंदा या तीन घराण्याव्यतिरिक्त ). काही कुटुंबात प्रतिवार्षिक बोडण असते.
शारदीय नवरात्र- मोडक कुलात घटस्थापना नाही. अखंडदीप आणि माळ सर्वघराण्यातून आहे. घराणे २० यातील मंडळीकडे बालाजीचे नवरात्र असते. ब्राह्मण-सुवासिनी-कुमारिका भोजन उठती बसती बहुतांकडे असते.(थोड्या कुटुंबात प्रतिदिवशी असते) सप्तशतीचा पाठ हदलीची तीन घराणी, नागपूर,इंदूर,नि कुटुंबशास्त्री या घराण्यात आहे. इतर घराण्यात एखाद-दुसऱ्या कुटुंबात शेजाऱ्यांच्या अनुकरणाने पाठ आलेला आहे.
इतर आचार- १ल्या घराण्यातील काही कुटुंबात चंपाषष्ठीचे व्रत म्हणजे खंडोबाची तळी भरणे हा आचार आहे. विनोदांकडे गिरीच्या वेंकटेशाचे व्रत आहे. पहिल्या घराण्याच्या केळवे-माहीम शाखेत नि हद्लीच्या रेश्मिकर घराण्यात नवरात्रात जोगवा मागण्याची चाल आहे. बेलवाडी,भट नि विनोद या घराण्यात नवरात्रात एका व्यक्तीस धान्यफराळ आणि कुटुंबशास्त्री एका व्यक्तीस निराहार असतो.
कोकणात तुलनात्मकदृष्ट्या फारशी श्रीमंती नसल्यामुळे आणि चित्पावन हे मुळचे कोकणचे, त्यामुळे त्यांचे कुलधर्म नि कुलाचार कमी खर्चाचे असावयाचे. पुढे घाटावर-समृद्ध देशात आल्यामुळे य सर्व आचाराना अधिक खर्चाचे वळण लागले. त्यामुळे नवरात्रादि इतर उत्सव काही कुटुंबात मोठया प्रमाणावर होऊ लागले.
| देवस्थानाचे नाव | प्रमुख शहरापासून देवस्थानाचे मार्ग |
|---|---|
| कोल्हापूर - श्री महालक्ष्मी | कोल्हापूर - श्री महालक्ष्मी देवस्थानाला जाण्यासाठी दिशानिर्देश |
| अंबाजोगाई - श्री योगेश्वरी | अंबाजोगाई - श्री योगेश्वरी देवस्थानाला जाण्यासाठी दिशानिर्देश |
| पंचनदी-कोळथरे - श्री कोळेश्वर | पंचनदी-कोळथरे - श्री कोळेश्वर देवस्थानाला जाण्यासाठी दिशानिर्देश |
| चिंदर-त्रिंबक - श्री रामेश्वर / मसुरे - श्री भरतेश्वर |
चिंदर-त्रिंबक - श्री रामेश्वर / मसुरे - भरतेश्वर देवस्थानाला जाण्यासाठी दिशानिर्देश |